श्री क्षेत्र चंद्रेश्वर, संगमेश्वर

निसर्गरम्य कोकण टीम :

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेला आंबवली गाव येथील "चंद्रेश्वर" या देवस्थानासाठी प्रसिद्ध आहे.

आंबवली गावात सप्तलिंगी नदीच्या काठी वसलेले हे शंकराचे स्वयंभू स्थान आहे. मुंबई गोवा राज्य महामार्गापासून जवळ असूनसुध्दा अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेले हे जागृत देवस्थान सध्या चांगलेच नावारुपाला आले आहे.याचे मुख्य कारण म्हणजे आंबवली पिंपळवाडी ते चंद्रेश्वर रस्ता नुकताच विकसित झाला आहे. शिवाय मुंबई गोवा राज्य महामार्गावरील वांद्री गावापासून हे देवस्थान फक्त ५ किलोमीटर अंतरावर आहे.त्यामुळे सध्या चंद्रेश्वरला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे.

देवस्थानच्या बाजूला असणारी हिरवीगार झाडी आणि बाराही महिने प्रवाही असणारी सप्तलिंगी नदी यामुळे या देवस्थानला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

हे देवस्थान आंबवली गावात असले तरी येथून जवळच म्हणजे नदीपलीकडे घोडवली गाव आहे. हे गाव देवरुख रत्नागिरी मार्गावर असल्यामुळे पर्यटक या मार्गानेसुद्धा चंद्रेश्वरला भेट देणे पसंत करतात.मात्र पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे हा मार्ग बंद असतो. पावसाळ्याव्यतिरिक्त या मार्गे चंद्रेश्वरला भेट देणे नक्कीच सोयीस्कर असते.

ऑक्टोबर ते मे महिना या देवस्थानाला भेट देण्यासाठीचा योग्य कालावधी असतो. कारण नदीतील पाणी योग्य प्रमाणात असल्यामुळे आपल्याला सप्तलिंगी नदीत स्नानाचा आनंद लुटता येतो.

या ठिकाणी कोणतीही दुकाने नसल्यामुळे देवदर्शनासाठी लागणारी फुले, श्रीफळ आणि इतर साहित्य आपल्याला गावातील दुकानातून न्यावे लागते. मात्र या देवस्थानापासून जवळच बेलाचे झाड असल्यामुळे आपल्याला शिवपिंडीवर बेलाची पाने वाहता येतात. या ठिकाणी नाष्टा किंवा जेवणाची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे आपण घरातूनच खाण्याचे पदार्थ घेऊन जाणे सोईस्कर म्हणता येईल.

महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.

जवळची ठिकाणे :

मार्लेश्वर : देवरुखपासून १६ किमी अंतरावर मार्लेश्वर हे शिवाचे प्रसिद्ध ठिकाण आहे.

टिकलेश्वर : सुंदर निसर्ग आणि नीरव शांतता अनुभवायची असेल तर टिकलेश्वरला मुद्दाम जायला हवं.

कर्णेेश्वर : मंदिराची एकूण रचना आणि त्यातील कोरीव काम पाहता पुरातन भारतीय कलासंस्कृतीचा एक जिवंत इतिहास आपल्यासमोर प्रकट होतो.

मल्लिकार्जुन : संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिर वेगळ्या अर्थाने प्रसिद्ध आहे. हे मंदिर चोहोबाजूनी पाण्याने वेढलेले आहे.

सोळजाई : सोळजाई देवरुख शहराची ग्रामदेवता आहे.

Web Title: Chandreshwar Ambavali Ratnagiri