श्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर

निसर्गरम्य कोकण टीम :

महाराष्ट्रातील लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मार्लेश्वर देवस्थानला भेट देणाऱ्या भाविकांची गर्दी दिवसागणिक वाढत आहे.

देवरुखजवळील मारळ गावात डोंगरावरील गुहेत हे स्वयंभू देवस्थान वसले आहे. देवस्थानासमोरील बारमाही वाहणारा धारेश्वर धबधबा आणि तीन बाजूंनी हिरवेगार डोंगर अशा नयनरम्य ठिकाणी हे देवस्थान असल्यामुळे पर्यटक मार्लेश्वरला भेट देणे पसंत करतात.

मार्लेश्वरचे दर्शन घेण्यासाठी भाविक वर्षभर येथे येत असतात. मात्र श्रावण महिन्याच्या सोमवारी आणि जानेवारी महिन्यातील मार्लेश्वराच्या जत्रौत्सवाला येथे खूपच गर्दी असते.

श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथील वार्षिकोत्सव दरवर्षी मकरसंक्रांतीला मोठ्या उत्साहात साजरा होतो. श्री देव मार्लेश्वरचा विवाह सनई चौघड्याच्या सुरात, मंगलाष्टके आणि मंत्रोच्चारांच्या मंगलमय वातावरणात साखरपा येथील कोंडगावच्या श्री देवी गिरिजाबरोबर थाटात संपन्न होतो. या सोहळ्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी गर्दी करतात.

शेकडो वर्षांपासून सुरु असलेला मार्लेश्वरचा वार्षिकोत्सव आंगवली येथील मार्लेश्वराच्या मूळ मठातून सुरु होतो. दिवसभर शिवपूजा आणि विविध कार्यक्रम करण्यात येतात. संध्याकाळी दीपोत्सव, देवाला हळद लावण्याचा आणि देवाचा घाणा भरण्याचा कार्यक्रम होतो. हिंदू धर्मातील लिंगायत विवाहशास्त्रानुसार विवाहापुर्वीचे सर्व विधी पार पडतात.

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर श्री देव मार्लेश्वर आणि गिरीजादेवीच्या विवाहसोहळ्याला हजारो भाविक उपस्थित राहतात. दुपारी बारा नंतरच्या मुहूर्तावर हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होतो.

श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी भाविक सकाळपासूनच येथे गर्दी करतात. या पवित्र दिवशी मार्लेश्वराच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी रांग पाहायला मिळते.

मार्लेश्वरचा निसर्ग पर्यटकांना साद घालत असतो. दरवर्षी पावसाळ्यात लाखो पर्यटक मार्लेश्वरला भेट देतात. फेसाळत कोसळणारा धारेश्वर धबधबा, मुसळधार पाऊस, हिरवेगार डोंगर आणि शेजारीच स्वयंभू देवस्थान हे दृश्य येथे अनुभवता येते.

जवळची ठिकाणे :

चंद्रेश्वर : मार्लेश्वरपासून जवळच असलेल्या आंबवली गावातील सप्तलिंगी नदीच्या काठी वसलेले हे शंकराचे स्वयंभू स्थान आहे.

टिकलेश्वर : सुंदर निसर्ग आणि नीरव शांतता अनुभवायची असेल तर टिकलेश्वरला मुद्दाम जायला हवं.

कर्णेेश्वर : मंदिराची एकूण रचना आणि त्यातील कोरीव काम पाहता पुरातन भारतीय कलासंस्कृतीचा एक जिवंत इतिहास आपल्यासमोर प्रकट होतो.

मल्लिकार्जुन : संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिर वेगळ्या अर्थाने प्रसिद्ध आहे. हे मंदिर चोहोबाजूनी पाण्याने वेढलेले आहे.

सोळजाई : सोळजाई देवरुख शहराची ग्रामदेवता आहे.

Web Title: Marleshwar Temple of Ratnagiri and Dhareshwar Waterfall of Marleshwar